अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- बेणे अनुदानात अशोकच्या संचालक मंडळाने सुमारे १२ कोटी रूपयांची अनियमितता दिसून येत आहे. तसेच कारखान्याच्या जमिनी शैक्षणिक संस्थेच्या नावे करून या जमिनी लाटण्याचा डाव असल्याचा आरोप करून याप्रकरणी संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणी आरोप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी केली आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशोक सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने बेणे हमी थकबाकी पोटी २००५ पासून आतापर्यंत असंख्य सभासदांच्या ऊस पेमेंट व भाग भांडवलमधून सुमारे १२ कोटी रूपयांची कपात करण्यात आली आहे.
अनेक सभासदांचे बेणे हमी नसतानाही वसुली केल्याचे दिसून येत आहे. प्रभाकर सारंगधर औताडे यांनाही कुठल्याही प्रकारणी बेणे हमी नसताना २०१४ साली १६ हजार रूपयांची नोटिस बजावण्यात आली. मात्र त्यांनी सहकार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना निल दाखला देण्यात आला.
त्यांच्याच नावे यावर्षी पुन्हा २३०० रूपयांची बाकी दाखवून कारखाना प्रशासनाने वाली वारसांची संमती न घेता जबरदस्तीने कपात केली. अशा प्रकारे अनेक सभासदांच्या खात्यानतून याप्रकारे कपात करून अनिययमितता केली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना प्रशासनाकडे याबाबत माहिती मागूनही दिली जात नसल्याने याबाबत साशंकता अधिक गडद झाली आहे.
सभासदांकडे सुमारे १२ कोटी रूपयांची थकबाकी असल्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत तोंडी सांगत ही बेणे हमी ऊस प्रोत्साहन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब होत आहे. तसेच कारखाना संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या जमिनी या संस्थेच्या नावे करण्याचा घाट वर्षभरापुर्वी संचालकमंडळाने घातला. त्यास शेतकरी संघटनेचे हरकत घेतली.
प्रादेशिक सहसंचालकांनी त्यानंतर हा प्रस्ताव अपात्र करून निकाली काढला. शिवाय सहकारी संस्थेचे प्रथम विशेष लेखा परिक्षक वर्ग १ यांनी याबाबत कारखान्याकडून विचारणा देखील केली मात्र याबाबत वर्ष उलटूनही प्रशासनाने कुठलाही खुलासा न केल्याने या शैक्षणिक संस्था कारखाना संलग्न आहेत की, नाही याबाबत सुस्पष्टता होत नाही.
तरी या वरील प्रकरणांमध्ये कारखाना संचालक मंडळास कलम ८८ अन्वये जबाबदार धरून हे संचालक मंडळ कलम ७८ अन्वये बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी केली आहे.