अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता 10वी पाठोपाठ 12वी च्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. 12वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होते, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं.
कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता राज्यामध्ये विविध स्तरावर निर्बंध लादण्यात आले. या परिस्थितीत इयत्ता 12 वी च्या परीक्षेचे आयोजन करण्यासाठी या परीक्षेत मोठ्या प्रमाणातील परीक्षार्थी उपस्थित राहणार असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची हाक्यता नाकारता येत नाही.
परिक्षार्थीच्या कुटुंबातील एखादा सदस्य कोरोना बाधित असल्यास त्या परिक्षार्थीने परीक्षेस उपस्थित राहिल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या परीक्षार्थींनाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे परिक्षार्थी हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात.
अशा प्रकारच्या परीक्षा टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इयत्ता 12 वी च्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.