अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे हातात धारदार शस्त्र घेऊन गावात नागरिकांच्या अंगावर धावून जाणे,घरातील लोकांना मारहाण करणे अशा प्रकारे दहशत माजवल्याप्रकरणी विकास दिलीप शिंदे,वय २४ वर्ष याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यामुळे गावातील जनता भयभीत झाली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विकास शिंदे हा दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांच्या अंगावर धावून जात आहे.
अशी माहिती कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील माळशिखरे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन यांचे एक पथक तयार करून त्या पथकाला राक्षसवाडी बुद्रुक येथे पाठवून त्यास ताब्यात घेण्यात आले.
विकास दिलीप शिंदे याच्याजवळ शस्त्र जवळ बाळगण्याचा कसलाही परवाना नाही. तरीही तो लोखंडी शस्त्र बेकायदेशीर जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आला आहे.
कर्जत पोलिसांनी पोलिस स्टेशन प्रतिबंधात्मक प्रस्ताव क्र. १/२०२१ सीआरपीसी १५१(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्ताव तयार करून
त्यास १४ दिवस कोठडीत ठेवणेबाबत मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रस्ताव दाखल केला.
व मा.न्यायालयाने त्यास २३/०६/२०२१ पर्यत असे १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई ही कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुनील माळशिखरे,
भाऊसाहेब यमगर,विकास चंदन यांनी केली.यावेळी राक्षसवाडी बुद्रुक गावातील नागरिकांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले.