अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सर्वांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जाणार हि घोषणा आठवतेय का? हि लोकप्रिय घोषणा केवळ घोषणाच राहिली पण याचा खराखुरा प्रत्यय आला तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आणि पुढे काय झाले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…
औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये १५ लाख रुपये जमा झाले. जनधन खात्यावर हे पैसे जमा झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं ज्ञानेश्वर यांना वाटलं.
त्यांनी हे पैसे खात्यात आल्यानंतर पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाला धन्यवाद म्हणणारं पत्र सुद्धा पाठवलं होतं. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी बँक ऑफ बडोदामधील खात्यावरुन नऊ लाख रुपये काढले.
या पैशांमधून त्यांनी घर बांधलं. मात्र आता बँकेने ज्ञानेश्वर यांना नोटीस पाठवली असून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकून तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले होते.
त्यामुळेच आता तुम्ही हे पैसे बँकेला परत करावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. मात्र नंतर हा पैसा पिपळवंडी ग्राम पंचायतीमधील विकासकामांसाठी पावणं अपेक्षित असून तो चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली.
चार महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला विकासकामांसाठीचा पैसा हा ज्ञानेश्वर यांच्या खात्यावर जमा झाल्याचं समजलं आणि त्यांनी यासंदर्भात बँकेकडे रितरस तक्रार केली.
या पैशांपैकी सहा लाख रुपये ज्ञानेश्वर यांनी बँकेला परत केलेत. मात्र त्यांनी याच पैशांमधून नऊ लाख खर्च करुन घर बांधलं आहे. आता हे नऊ लाख रुपये त्यांना बँकेला परत करावे लागणार आहेत.