अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
हे तीनही पोलिस कर्मचारी उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकात कार्यरत होते. कॉन्स्टेबल वसंत कान्हू फुलमाळी (वर्ग ३ नेमणूक -उप विभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर),
संदीप वसंत चव्हाण (वर्ग-३, नेमणूक – पाथर्डी पोलिस स्टेशन, सध्या संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक),
कैलास नारायण पवार (वर्ग -३, नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न – उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक) अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदाराची वाळूची ट्रक या तिन्ही पोलिसांनी पकडली. ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता लाचेची मागणी केली.
पोलिसांनी पंचासमक्ष तक्रारदारांकडे तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
लाच मागण्याची व घेण्याचे सिद्ध झाल्याने तिन्ही पोलिसांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.