अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी बाजारपेठेतील २ दुकाने फोडून गणपती मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याने राहुरी शहरात खळबळ उडाली. चोरी करणाऱ्या दोघांची छबी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहरातील नवीपेठेत मध्यरात्रीच्या वेळात एकाच रात्री चोरीच्या ३ घटना घडल्याने सराईत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले.
नवीपेठेतील वर्धमान या कापड दुकानचा पाठीमागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवत दुकानातील टी शर्ट, पॅन्ट, लहान मुलांचे तयार कपडे तसेच १२ हजारांची रोकड चोरून नेली. तसेच बाहेर पडताना दुकानातील सीसी टीव्हीचे नुकसान केले.
सकाळी दुकान उघडण्यासाठी दुकानदार आल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. कापड दुकानातील पैसे व कपडे असा २० हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्यानंतर दुकानच्या शेजारी असलेले सोना या
चप्पल दुकानाच्या छताचा पत्रा कापून आत प्रवेश मिळवत दुकानातील ५ हजार रुपये किंमतीचे चप्पल व बुटाचे जोड तसेच १ हजार रुपयांची चिल्लरची चोरी केली.
या पाठोपाठ जवळच असलेल्या गणपती मंदिराकडे आपला मोर्चा वळवून दानपेटी चोरून घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.