अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- सतत पिण्याच्या पाणी प्रश्नाबद्दल चर्चेत असणाऱ्या कोपरगाव पालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. नळजोडणी दिलेली नसतानाही तब्बल दोन वर्षांची पाणीपट्टीची पावती दिल्याने शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील समतानगर येथील रहिवाशी नितीन रामचंद्र थोरात यांनी दोन वर्षांपूर्वी पालिकेकडे नळजोडणीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून अनामत रक्कम भरली होती.
अद्यापही त्यांना जोडणी दिली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही. उलट पालिकेने त्यांना वार्षिक १ हजार ६५० रुपयांप्रमाणे दोन वर्षांची ३ हजार ३०० रुपये पाणीपट्टी आणि २ टक्के शास्ती असे एकूण ३ हजार ५९८ रुपये थकबाकीची पावती पाठवली. अचानक एवढ्या रकमेची पावती मिळाल्याने थोरात यांना धक्काच बसला.
एक थेंबही पाणी न देता उलट पाणीपट्टीची पावती पाठविल्याने पालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून, ही पट्टी माफ करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.
या प्रकरणाची पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता ऋतुजा पाटील यांनी दखल घेतली असून, नळजोडणी का दिली नाही याची चौकशी करू असे सांगितले. तर नूतन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी देखील दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
नळजोडणीसाठी पालिकेला अर्ज करूनही आणि वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नसल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर काम लवकर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी लाच घेत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.