चोरीचे 4 लाखाचे 21 मोबाईल केले जप्त, पोलिसांची जबरदस्त कारवाई !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण गावात रोडवर असणारे प्रगती मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे 3 चोरट्यांना अटक करून 4 लाख 20 हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

कर्जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 11जुलै 2021 रोजी कुळधरण गावात रोडवरील प्रगती मोबाईल शॉपी दुकान रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 5 लाख 20 हजार रु किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरून नेले आहेत,

अशी प्रमोद पोपट चव्हाण (रा. धालवडी ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली, या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन सदरचा गुन्ह्याचा तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील गुन्हेगार चेक करत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरची मोबाईल शॉपीची घरफोडी ही आष्टी (जि. बीड) तसेच बेनवडी ( ता. कर्जत) आणि करमाळा येथील आरोपींनी केली आहे. आता ते आरोपी चीलवडी गावचे शिवारात वीटभट्टीवर काम करत आहेत.

तात्काळ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित पप्पू सर्जेराव गायकवाड, (वय 25, रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड), सुरज बाळु गायकवाड (वय 20, रा बेनवडी, ता कर्जत) यांना ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी करीत पोलिस खाक्या दाखविताच, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी अधिक माहिती दिली की सोबत आणखी दोन जोडीदार आहेत, ते खडकी (ता. करमाळा) येथील आहेत.

या माहितीवरून खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड (रा. खडकी, ता. करमाळा) यास मोठ्या शिताफीने पकडले. या सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेली 4 लाख 20 हजार रु किमतीचे एकूण 21 मोबाईल जप्त करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24