अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- गावच्या हद्दीत मुथाळणे-सातेवाडी मार्गावर येसरठाव शिवारातील तीव्र उतारावर आज (रविवार) सकाळी पिकअप उलटला. या अपघातात पिकअपमधील ५५ पैकी २१ शेतमजूर जखमी झाले.
या प्रकरणी वंदना भीमा दिघे (रा. सातेवाडी, ता. अकोले ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक ठका लक्ष्मण कचरे (रा. पळसुंदे, ता. अकोले) याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील सातेवाडी, खेतेवाडी, पळसुंदे व इतर वस्त्यांवरील शेतमजूर जुन्नर तालुक्यातील उदापूर, बनकर फाटा येथे शेतमजुरीसाठी जातात.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता सातेवाडीहून हे मजूर पिकअपने (एमएच- १४ एएच- ९२८१) मजुरीसाठी जात होते. पिकअप मुथाळणे गावाच्या हद्दीतील चढ चढत असताना तिच्यात बिघाड झाला.
त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. त्यातील २१ मजूर जखमी झाले. त्यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
डॉ. यादव शिखरे यांनी जखमीवर उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.