अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- खाजगी सावकारकीच्या विरोधात कर्जत पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत आत्तापर्यंत गोरगरीब-सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे सर्वसृत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक खाजगी सावकारांना धडा शिकवल्याने आणि यामध्ये बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना विश्वास दिल्याने आता अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.तालुक्यातील भिताडेवस्ती-परिटवाडीच्या सावकाराची अवैध सावकारकी तर अक्षरशः सर्वांनाच डोळे पांढरे करायला लावणारी आहे.
याबाबत माहिती अशी की, देशमुखवाडी येथील एक तक्रारदार (वय ५३) यांचा शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय होता.सन २०१४ साली त्यांच्याकडे लहान-मोठ्या २०० गाई होत्या. प्रतिदिनी २ हजार लिटर दुध उत्पादन होत होते, मात्र त्यावेळी दुष्काळ आणि घसरलेल्या दूध दरामुळे त्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत आला.
व्यवसायासाठी काढलेल्या युनियन बँक कर्जाचे हप्ते व रोजचा गुरांचा चारा भागवण्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीच्या अमृत किसन भिताडे (रा.भिताडेवस्ती परिटवाडी) यांच्याकडून (दि.२५ डिसेंबर २०१५) रोजी ३ लाख रुपये ६ रु. टक्के व्याजदराने घेतले होते. प्रत्येक महिन्याला १८ हजार रु. प्रमाणे मार्च २०२१ पर्यंत ६३ महिन्यांचे ११ लाख ३४ हजार व्याजापोटी दिले.त्यानंतर (दि.७ जानेवारी २०१८) रोजी ६ रु.टक्केवारीने १ लाख घेतले व्याजापोटी ३८ महिन्यांचे २ लाख २८ हजार सावकाराला दिले.
त्यानंतर (दि.१७ जानेवारी २०१८) रोजी सावकार भिताडे याच्याकडून चाऱ्यासाठी ४ लाख रु. ६ रु. टक्के व्याजदराने घेतले.मार्च २०२१ पर्यंत ३८ महिन्यांचे तब्बल ९ लाख १२ हजार व्यजापोटी दिले.पुन्हा शेतात पाईलाईन करण्यासाठी (दि.२७ मे २०१८) रोजी ६ रु. टक्के व्याजदराने ३ लाख रुपये घेतले होते त्याची मार्च २०२१ पर्यंत ३४ महिन्याचे तब्बल ६ लाख १२ हजार रक्कम सावकाराला दिली होती.
त्यानंतर मात्र सावकार भिताडे यांनी तक्रारदार यांना व्याजाच्या रकमेसह मुद्दलाच्या रकमेची मागणी केली.मात्र मोढळे यांच्याकडे देण्याकरता पैसे नसल्याने (दि.२ सप्टेंबर २०२०) रोजी फिर्यादी व फिर्यादीचे साडू या दोघांनी चारा वाहण्यासाठी आणलेली ट्रॅक्टरची ट्रॉली बळजबरीने मारहाण करून त्यांच्या ट्रॅक्टरने ओढून नेली.
आजतागायत ती ट्रॉली सावकाराच्याच ताब्यात आहे.त्यानंतर २०२१ मध्ये फिर्यादीच्या पत्नीचा दागिना वृषाली जंजिरे पतसंस्थेत तारण मी सोडवून देतो असे म्हणाला व ठेवलेला ५ तोळ्यांचा सोन्याचा गंठन ७३ हजार भरून मुद्दलीच्या रकमेतून कमी करतो म्हणत तो गंठन स्वतः घेऊन गेला.त्यानंतर सावकाराने फिर्यादीच्या घरी येऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व दमदाटी केली होती.
घरी येऊन व्याजाच्या पैशांसाठी गाई विकायला लावून त्याचे पैसे स्वतःकडे घेत होता.बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे फिर्यादीचे पुन्हा त्याच सावकाराकडुन २२ मार्च २०२१ रोजी ४ रु.टक्के व्याजदराने २ लाख रुपये घेतले.फिर्यादी यांनी १३ लाख मुद्दल रकमेचे मार्च २०२१ पर्यंत २८ लाख ८६ हजार रुपये दिले आहेत.
फिर्यादीने गाई विकून व्याजाची रक्कम दिलेली होती मात्र आता मार्च २०२१ नंतर पैसेच नसल्याने व्याजाची रक्कम देता आली नाही.आत्तापर्यंत एवढी मोठी रक्कम देऊनही आणखी १३ लाख मुद्दल व त्यावरील व्याज राहिले आहे असे म्हणत शिवीगाळ धमक्या असे प्रकार सुरू होते.
मार्च २०२१ मध्येही पैशांसाठी राशीनच्या अंबालिका डेअरीवर तसेच पुन्हा महाराष्ट्र बँकेसमोरही गचांडी धरून,शिवीगाळ करून दमदाटी केली होती त्यावेळी येथील लोकांनी सोडवासोडव केली होती.फिर्यादीने आपण त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मार्च २०२१ पर्यंतच्या हिशोब तक्रारारीत दिला आहे. कर्जत पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रारदार यांचे तक्रारीवरून भा.द.वी.कलम ३९२,४५२,५०४,५०६,३४ व महाराष्ट्र सावकारकी कायदा कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , पोलीस उप निरीक्षीक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊ काळे, तुळशीराम सातपुते, सचिन म्हेत्रे, गणेश ठोंबरे, गणेश भागडे, संपत शिंदे, देवा पळसे यांनी कारवाई केली.