Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी गुरुवारपासून (१४ डिसेंबर) संपावर जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये जिल्हा परिषद व अन्य सरकारी कार्यालयांतील २९ हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होणार आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर समोर देखील गुरुवारी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमाळे यांनी बुधवारी दिली.
या संपात सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, सुनील पंडित, महेंद्र हिंगे, बापूसाहेब तांबे, वैभव सांगळे, शिरीष टेकाडे, पी.डी. कोळपकर, विलास पेद्राम, नलिनी पाटील, विठ्ठल उरमुडे यांनी केले आहे.
संपाच्या निर्णयावर ठाम
जुन्या पेन्शन योजनेबाबत सहा महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी, शिक्षक संतप्त आहेत. राज्यातील १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असून, संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहोत, असे ढमाळे यांनी सांगितले.