अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील तरुण रोहित कचरू लांडगे (वय 24) याने राहते घरी आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू व पत्नीस या गुन्ह्यात पूर्वीच अटक करण्यात आली पण अन्य 3 फरारी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रोहित लांडगे याची पत्नी शिवानी ही नेहमी डिग्रस येथील तिच्या माहेरी जात असे. 15 एप्रिल रोजी रोहित याची सासू बिट्टबाई मारूती शिनगारे व छकुल्या बोरूडे हे शिवानी हिला घेण्यासाठी वरवंडी येथे आले.
पत्नीला घेण्यासाठी नेहमी छकुल्या बोरूडे हाच का येतो? असा प्रश्न रोहित याने सासू बिट्टबाईला विचारत पत्नीला माहेरी पाठविण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून छकुल्या बोरुडे यांनी त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेऊन रोहित लांडगे यास मारहाण करून त्याचे पत्नीस डिग्रस येथे घेऊन आले.
त्यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी रोहित लांडगे याने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याबाबत मयताची आई शिवाबाई कचरू लांडगे वरवंडी ता. राहुरी यांनी राहुरी पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून मयताची सासु, पत्नी, छकुल्या बोरुडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी छकुल्या ऊर्फ सतिष रावसाहेब बोरूडे (वय 19), मोईन अमीर शेख (वय 31), सिमा रावसाहेब बोरूडे (तिघे रा. डिग्रस ता. राहुरी) यांना अटक केली आहे.