अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- काेरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपूर्वी २८ मार्च रोजी झालेली प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झालेली असताना या सभेसाठी लाखो रुपये कोणत्या कारणासाठी खर्च करण्यात आले, असा सवाल राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सहाणे यांनी केला.
ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संचालक मंडळाने तब्बल ३ लाख २८ हजार ८५८ रुपयांची उधळपट्टी केली. सभेसाठी करण्यात आलेल्या खर्चात गैरव्यवहार झाला असल्याचा संशय सहाणे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे त्याचवेळी झालेल्या प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या सभेसाठी फक्त नऊ हजार रुपये खर्च झाले.
शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार विकास मंडळाचा कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचे प्रसिद्धी पत्रकात सहाणे यांनी म्हटले. सभासद हिताच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी मंडळाच्या नेतृत्वाने सभासदांची लूट केली.
येत्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासद सत्ताधारी मंडळाला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा गणपत सहाणे यांनी दिला. येत्या रविवारी, २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मत मांडण्याची संधी मिळेल की नाही, अशी शंका सामान्य सभासद व्यक्त करू लागले आहेत.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा गणपत सहाणे यांच्यासह बाळासाहेब शेळके, तान्हाजी वाडेकर, भाऊसाहेब हासे, सुदाम धिंदळे, राजेंद्र भांगरे, राजू थोरात, बाळासाहेब बांबळे, संजय भोर, बहिरू जाधव, सदा आरोटे यांनी दिला आहे.