जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोना उपाययोजनांवर खर्च होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. अद्यापही दरदिवशीच्या रुग्णांची संख्या हि हजारोंच्या घरात आहे. यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात येत आहे.

आता या उपाययोजनांना आर्थिक बळ मिळावे यासाठी पालकमंत्र्यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यात कोरोनाची सध्या परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे.

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी भाळवणी (ता. पारनेर) येथील शरद पवार कोविड केअर सेंटर भेट देऊन पाहणी केली.

तसेच पारनेर तालुक्याचा आणि त्यानंतर श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तालुक्यातील करोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे.

मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो.

ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसर्‍या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. संभाव्या तिसरी लाट लक्षात घेऊन आणि पहिल्या व दुसर्‍या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन आता प्रशासन म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी तयार राहिले पाहिज असं ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24