अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-महाआघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदारसंघातील जिल्हा हद्द रस्त्याच्या (प्रजिमा ५) १६ किलोमीटर अंतराच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकात आमदार काळे यांनी म्हटले, की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे संवत्सर, भोजडे, धोत्रे, रवंदे, टाकळी तसेच परिसरातील गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. यामध्ये पवार गिरणी संवत्सर, भोजडे, धोत्रे जिल्हा हद्द रस्ता या रस्त्याच्या १६ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल केला होता.
त्या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता देऊन या रस्त्यासाठी ४ कोटी रुपये निधीस मंजूरी दिली आहे. सततच्या पाठपुराव्यातून कोरोनाच्या संकटातदेखील या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे.
लवकरच या रस्त्याच्या कामास प्रारंभ होऊन नागरिकांना होत असलेला त्रास संपणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. रस्त्याचा प्रश मार्गी लावल्याबद्दल सबंधित गावातील नागरिकांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहेत.