अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संगमनेरात तीन दिवसांत ४५१ रुग्ण आढळल्याने बाधित संख्या झपाट्याने वाढून ९८३२ झाली. शुक्रवारी ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ८७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
१०४६ बाधितांवर उपचार सुरू आहे. तर ६९ जणांचा कोरोनाने बळी गेल्याने मृत्यू दर ०.७० टक्क्यांवर आहे. प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील असले तरी प्रादुर्भाव पाहता अलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज भासत आहे.
शनिवार, रविवार पूर्णतः लॉकडाऊन असल्याने फक्त आरोग्य सेवा सुरू राहणार आहेत. कोरोनाचा दुसरा कहर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अंगलट आला आहे. अद्यापही निष्काळजीपणा होताना दिसतो आहे.
निर्बंध लादले असतानाही नियम धाब्यावर आहेत. प्रशासन हतबल झाले आहे. त्यातच दुकाने उघडण्यासाठी सर्वच स्तरातून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. असेच चित्र राहिले तर परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनावर मात्र ताण पडत आहे. दोन दिवसात नागरिकांचा प्रतिसाद प्रशासनाला अपेक्षित आहे. यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. शहरातील बाधित संख्या २९२१ असून ग्रामीण भागात तिपटीने वादातून ६९११ झाली आहे.
दरम्यान शनिवार व रविवारी दोन दिवस पूर्णतः लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी घरा बाहेर पडता कामा नये. अन्यथा कठोर शासन करू, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.