अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-श्रीरामपूरातील देवकर वस्ती परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या फिरत होते. पोलिसांनी त्या वाहनाच्या चालकाकडे चौकशी केली.
सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली. वाहनातील खोक्यांमध्ये पिशव्यांमध्ये गांजा भरून ठेवल्याचे आढळून आले.
कोरोनाच्या संकट काळात अवैध धंदे सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट झाले. वाहनाचा चालक गणेश भास्कर सरोदे (वय ३८, रा. देवकर वस्ती, श्रीरामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून ४ लाख ६० रुपये किमतीचा ४६ किलो गांजा, चार लाख रुपये किंमतीची चारचाकी असा एकूण ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, जोसेफ साळवी, पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव, सुनील दिघे यांच्या पथकाने केली.