अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- देशात गेल्या १ मे पासून देशव्यापी लसीकरण मोहीम राबविली जात असतानाच आगामी १५ जूनपर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तब्बल ५.८६ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसींचे डोस मोफत स्वरूपात देणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी केली आहे.
भविष्यात लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची मुभा दिल्याने राज्यांना ४.८७ कोटी एवढे डोस मिळू शकणार आहेत.
देशव्यापी लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या लसींचा तत्काळ वापर करण्यासाठी योग्य दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणासाठी जिल्हानिहाय उपाययोजना आखाव्यात. त्यात प्रामुख्याने कोविड लसीकरण केंद्रांना प्राधान्य द्यावे, असे आरोग्य मंत्रालयाने सुचविले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण योजनेबाबत समाजात जनजागृती करावी. केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी होऊ देऊ नये.
लस घेण्याची तारीख व वेळ ठरविण्याची प्रक्रिया सुलभ करावी. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.