अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- सोनई परिसरातील तरुण मंडळ व पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा परप्रांतीय चोरट्यांना नेवासा परिसरात पकडले होते. या चोरट्यांना नेवासा न्यायालयात हजर केले असता या सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी राहात असलेल्या ठिकाणाहून डिझेलचे 3 मोठे पिंप हस्तगत करण्यात आले. दरम्यान नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील पेट्रोलपंप, धाबे याठिकाणी मोठी वाहने रात्री जेवणासाठी व मुक्कामासाठी थांबत असतात.
या वाहनांमधून डिझेलची चोरी तसेच जबरी चोरी आरोपी करत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून डिझेल चोरांचे फार मोठे रॅकेट सक्रिय असण्याचा संभव असून यापूर्वीही रात्रीच्यावेळी महामार्गावर मोठ्या वाहनातून डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.
हे चोरीचे डिझेल निम्म्या दराने विकत असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत. हे रॅकेट कोण चालवत होते? हे स्वस्तातले डिझेल कोण खरेदी करत होते?
या सर्वांचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.