अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाचा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्ड क्रमांक-६ मधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी साडेतीन वाजेच्या सुमारास संपली.
ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित होते. परंतु, अर्धातास उलटूनही कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन टाकी बदलली नाही.
त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने एका आजोबांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला. अधिक विचारपूस केली असता इतर रुग्णांना देखील ऑक्सिजन १५ ते २० मिनिटांपासून बंद असल्याचे सांगितले.
त्यामुळे ऑक्सिजनची टाकी बदलण्यासाठी कर्मचाऱ्याचा शोध घेतला. मात्र कर्मचारीच उपस्थित नसल्याचे आढळून आले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली.
कर्मचाऱ्यांचा शाेध घेऊन तातडीने टाकी बदलण्यात आली. परंतु, तोपर्यंत आजोबांचा मृत्यू झाला होता.
इतर दोघांना यामुळे त्रास होऊ लागला होता. ऑक्सिजन पूर्ववत झाल्याने त्यांचे प्राण वाचले.