ताज्या बातम्या

RTO च्या चकरा वाचणार, ११५ पैकी ८४ सेवा ऑनलाइन

Published by
Ahmednagarlive24 Office

RTO news : परिवहन विभागातर्फे म्हणजेच RTO कडून अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यातील ८४ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत.

त्यामुळे नागरिकांच्या चकरा वाचणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता अर्ज, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालकाच्या अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, पत्ता बदल, नूतनीकरण या सेवांसाठी अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागत होते.

त्यासेवाही आता ऑनलाइन झाल्या आहेत. त्याचा प्रारंभ परब यांच्या हस्ते करण्यात आला. आता वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, अनुज्ञप्तीची दुसरी प्रत, अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, वाहन नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत, या प्रमाणपत्रातील पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही, असे मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यासाठी आता आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवा सुरू झाली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड आणि त्यावरील अचूक भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक आहे अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि भ्रमणध्वनी क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर ऑनलाइन करण्यात आलेल्या सहा सेवांकरिता अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

तसेच नवीन अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र हे अर्जदारास टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे. कागदपत्रांचीही प्रत काढण्याची आवश्यकता राहणार नाही. या सेवेचा फायदा २० लाख नागरिकांना मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office