अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ मंत्री शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक कामांचा आढावा घेतला. तसेच यावेळी अनेक महत्वपूर्ण घोषणा देखील केल्या. दरम्यान शहरातील नागरी समस्यांसाठी महापौरांनी मंत्री शिंदे यांची भेट घेतली.
महापालिका हद्दीतील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ८५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी महापौर वाकळे यांनी हे निवेदन दिले, यामध्ये म्हंटले आहे की, नगरला ३० जून २००३ रोजी महापालिका स्थापन होवून ११ गावांचा महानगरपालिका हद्दीमध्ये समावेश करण्यात आला. सदर हद्दीवाढीच्या गावांमध्ये मुलभूत नागरी सुविधा देणे आवश्यक आहे.
सदर गावांतील अंतर्गत रस्ते, गटार, पिण्याच्या पाणी, विद्युत व्यवस्था इ. विकास कामे करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.
महापालिकेस दैनंदिन खर्चापोटी पाणीपुरवठा वीज बिल, पथदिवे वीजबील, मनपा कर्मचारी यांचे वेतन, सेवानिवृत्ती कर्मचारी पेन्शन, ठेकेदार व पुरवठा यांचे देयके यांचा अत्यावश्यक खर्च आहे.
त्यामुळे निधीअभावी शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. त्यामुळे महापालिका हद्दीतील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ८५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे.