अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- संगमनेर शहरापासून काही अंतरावर असणार्या कोल्हार-घोटी मार्गावरील ह्युंदाई कंपनीचे चारचाकी वाहनाचे शोरूम फोडत चोरट्यांनी मोठा ऐवज चोरी केल्याची शक्यता आहे.
याबाबत दालन व्यवस्थापन व पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून काही अंतरावरच कोल्हार-घोटी मार्गावर ह्युंदाई कंपनीचे दालन आहे.
नेहमीप्रमाणे हे दालन सोमवारी (ता.15) बंद करुन अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाच्या सहाय्याने संरक्षक भिंतीच्या आतमध्ये प्रवेश केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
त्यानंतर शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. रोखपाल कक्षाची व कोठारामधील सामानाची उचकापाचक करत ऐवज चोरल्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
यामध्ये दोन चोरटे प्रथमदर्शनी दिसत असून अजूनही चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सकाळी शोरूम खुले करण्यासाठी सुरक्षा रक्षक, अधिकारी व कर्मचारी आले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
तत्काळ याची माहिती दालनाचे संचालक संदीप शिरोडे यांना दिली. तसेच पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दालनाची संपूर्ण तपासणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
यानंतरच किती ऐवज चोरीला गेला आहे हे निष्पन्न होणार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.