अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
नुकतेच राहता तालुक्यातील एका रिटायर्ड शिक्षकाच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी बंद खोलीचे कुलूप व कोंयडा तोडून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत माळीनगर भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक दगडू मारुती वाघे (वय ६२) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीत त्यांनी म्हंटले आहे कि, बुधवार दि.17 फेब्रुवारी 21 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पैसे ठेवलेल्या खोलीला कुलूप लावून आम्ही शेजारच्या खोलीमध्ये झोपलो असता मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास मला जाग आली.
मी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावल्याचे माझे लक्षात आले म्हणून मी शेजार्यांना फोन करून दाराची कडी उघडायला लावली. दार उघडल्यानंतर मी बाहेर येऊन शेजारी असलेल्या खोलीची पाहणी केली असता पैसे ठेवलेल्या खोलीमधील रोकड चोरटयांनी लांबविल्याचे दिसून आले.
दरम्यान या टेबलच्या कप्प्यात दोन हजाराच्या व 500 रुपयांच्या नोटा मिळून सुमारे तीन लाख 25 हजार रुपयांची रोकड होती ही रोकड अज्ञात चोरट्याने ही चोरून नेली असल्याचे वाघे यांनी फिर्यादीत म्हटले आहे राहाता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.