अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल-मे महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही.
अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते, पण ती पुरेशी ठरणारी नाही.
त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला. आणि त्यासाठी एकदंत गणेश मंडळाने ‘एक हाक मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी मंडळाने परिसरातील नागरिकांना टाकावू वस्तू पासून बनवले प्लास्टिकचे भांडे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने परिसरात विविध ठिकाणी प्लास्टिकच्या डब्यात पक्षांसाठी पाणी आणि धन्य सोय करण्यात आली आहे.
मंडळाच्या वतीने या डब्यामध्ये दररोज पाणी आणि धन्य ठेवण्यात येणार आहे. 200 डबे परिसरात वाटण्यात आले आणि 100 डबे परिसरात विविध ठिकाणी तसेच झाडांवर ठेवण्यात आले. आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत.
परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत.
वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात.
पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे यावेळी मंडळाने सांगितले.
या उपक्रमास मंडळाचे श्रीकांत आडेप, भास्कर जिंदम, देविदास सादुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंडळाने हे सर्व डबे टाकावू वस्तू पासून बनवले आहे. या उपक्रमाचे परिसरात व शहरात कौतुक होत आहे.
मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम करण्यात आला. यावेळी शासनाचे सर्व नियम पाळण्यात आले.