अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- बालविवाह लावून देणे हा गुन्हा असून देखील अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यातच एका असाच काहीसा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पाथर्डीत घडला आहे.
मुलीचा बालविवाह केल्याच्या आरोपावरून पाथर्डी पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शिरसाठवाडी येथील ग्रामसेवक अर्चना विठ्ठल सानप यांनी फिर्याद दिली आहे. शिरसाठवाडी येथे २५ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मुंबई येथील मर्जी संघटनेचे संस्थापक मंगेश सोनवणे यांना मिळाली होती.
सोनवणेंनी याबाबत नगरची चाइल्डलाइन, बालकल्याण समिती तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी चाइल्डलाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनी शिरसाठवाडी येथील ग्रामसेवक, सरपंच व पाथर्डी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी या विवाहाची खात्री केली तेव्हा मुलीचे वय अवघे चौदा वर्षे असल्याचे समोर आले.
त्यानंतर ग्रामसेविका सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यत प्रथमच बालविवाहाच्या आरोपावरून लग्न लावणारे पुरोहित, मंडप, सजावटकार तसेच विवाहास उपस्थित असणाऱ्या २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.