अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. मात्र माणुसकीच्या नात्याने अनेकांनी याकाळात पीडितांना मदत केली.
एकीकडे माणुसकीचे जिवंत उदाहरण असताना दुसरीकडे मात्र माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य दुकानदाराकडून काळाबाजारात विक्री करण्याचा डाव उघडा पडला आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानासाठी आलेला गहू, तांदूळ, साखर, चना डाळ, मका, चना आदी मालाचे लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर खुल्या बाजारात विक्री करून सुमारे 3 लाख 56 हजार 454 रूपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
या स्वस्त धान्य दुकानदाराने शासनाची फसवणूक केल्याने दुकानदार भाऊसाहेब भिमराज शिंदे (रा. पिंपळगाव माळवी, ता.नगर) याच्या विरूध्द पुरवठा निरीक्षक महादेव अर्जुन कुंभार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत स्वस्त धान्य दुकान चालविण्यात येते. या दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता या दुकानात कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून आली होती.
त्यानंतर दुकानदाराकडून याबाबत खुलासा मागवला होता. त्यानंतर पुन्हा पुरवठा निरीक्षकांनी स्वस्त धान्य दुकानातील साठा व रजिस्टरची तपासणी केली असता दुकान चालकाने 3 लाख 56 हजार 454 रूपये किंमतीचे गहू, तांदूळ, साखर, चना डाळ,
मका आदी धान्याचे गरजू लाभार्थ्यांना वाटप न करता त्याची स्वत:च्या फायद्याकरीता साठवणूक करून खुल्या बाजारात परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.