अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-औरंगाबादेत कोरोना नियम पायदळी तुडवणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरात लॉकडाऊनचा निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीत कोणीही तोंडावर मास्क वापरला नव्हता.
तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवण्यात आले होते. कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्यामुळे भाजपचे नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
जोपर्यंत इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यं मागे हटणार नाही, असा इशारा दिला होता. अखेर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे नेते अमय खोपकर यांनी जलील यांची काढण्यात आलेल्या रॅलीवर तीव्र संताप व्यक्त केला होता. MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर आहे,
अशा परिस्थितीत मिरवणूक काढताय, जल्लोष करायला लाज वाटायला पाहिजे. हा तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, अशी टीका खोपकर यांनी केली.