शस्त्राचा धाक दाखवुन प्राध्यापकाच्या घरावर धाडसी दरोडा, मोठा ऐवज लुटला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या घरी काल मध्यरात्री ३ वाजेच्या दरम्यान १०-१२ चोरट्यांनी दरोडा टाकुन घरातील ऐवज लुटुन नेला.

ऐनतपुर शिवारातील श्रीरामपूर शहरालगत वॉर्ड नंबर पाच मधील बोंबले वस्ती येथे शिक्षक कॉलनी येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे येथे त्यांच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. काल मध्यरात्री त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूचे गेट तोडुन चोरट्यांनी किचन मधुन घरात प्रवेश केला.

यावेळी घरात ते त्यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा असे पाच जण होते. घरात प्रवेश करताचत चोरट्यांनी प्रा. सदाफुले यांच्या गळ्याला चाकू लाऊन आम्हाला विरोध केला तर चिरून टाकण्याची धमकी दिली. शस्त्राचा धाक दाखवुन दहशत निर्माण केली. त्यानंतर घरात उचकापाचक करुन हाती लागेल तो ऐवज लुटून नेला.

यावेळी त्यांच्या पत्नीने धाडस दाखवीत चोरट्यांचा मराठीतून शिवीगाळ करुन विरोध केला. त्यावर चोरटे त्यांच्याशी बहेनजी, बहेनजी.. असे बोलुन संवाद साधत होते. त्यात दहा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

चोरटे घरातील मोबाईल घेऊन जात असताना मुलांनी आमच्या ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नका नेऊ, अशी विनवणी केली त्यामुळे त्यांनी मोबाईल नेले नाहीत. सुदैवाने त्यांनी घरातील कोणालाही मारहाण केली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चोरटे हिंदी भाषेत बोलत होते.

किती ऐवज गेला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.

दरोडेखोर हिंदीत बोलत असल्याने ते खरंच परप्रांतीय आहेत की त्यांनी दिशाभुल करण्यासाठी हिंदी भाषेत संवाद साधला याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतू स्थानिक एखादा माहितगार व्यक्तीचा यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहमदनगर लाईव्ह 24