कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात मित्रांकडून मित्राचा खून केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात रविवारी (२३ जानेवारी) रात्री नितीन अंकुश पोटरे, ( ३४ रा. पिंपळवाडी ता. कर्जत) यास त्याचे मित्र आनंद बबन परहर व जावेद अब्बास शेख, दोघे रा. पिंपळवाडी यांनी काहीतरी अज्ञात कारणावरून
संगनमताने पिंपळवाडी शिवारातील ‘कुकडी’च्या येसवडी चारीत पाण्यात बुडवून मारले आहे, अशी फिर्याद महेश अंकुश पोटरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली.
आरोपी परहर आणि शेख यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (२३ जानेवारी) सायंकाळी हे तिघेही एकत्र येऊन यांच्यात वाद झाला होता.
यातून पोटरे यास परहर व शेख या दोघांनी पाण्यात ढकलून दिले व तेथून निघून गेले होते. याप्रकरणीा पोटरे यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात नितीन पोटरे बेपत्ता झाल्याची खबर दिली होती.
त्यानंतर तळवडी शिवारातील चारीत पाण्यात नितीन अंकुश पोटरे यांचा मृतदेह मिळून आल्याने कर्जत पोलिस ठाण्यात परहर व शेख यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलिस अंमलदार तुळशीदास सातपुते, सचिन वारे, भाऊसाहेब काळे, अर्जुन पोकळे यांनी आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत (३१ जानेवारी) पोलिस कोठडी सुनावली.