अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता.
या बिबट्याने गावच्या परिसरात राहणारे भिवा घुले यांच्या तीन मेंढ्या, एक पाळीव कुत्रा, तसेच नरेंद्र तोडमल व दादा काळे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांचा फडशाही पाडला होता.
चापेवाडी शिवारात एका व्यक्तीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जेऊर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिसरात जावून पाहणी केली होती.
त्यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे वन विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नगर -औरंगाबाद महामार्गावरील जरे वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्या नरभक्षक बिबट्याचा मृत्यू झाला. त्याच्या तोंडावरून वाहनाचे चाक गेलेले आढळून आले.