अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. नियोक्तेच श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील एका शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
बिबट्याने केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात सदर महिला जखमी झाली असून जागीच बेशुध्द झाली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवार दिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नवनाथ आव्हाड यांची महांकाळवाडगाव परिसरात शेती असून
त्यांच्या शेतात काम करणार्या अनिता भोसले (वय 30) या मजूर महिलेस आव्हाड त्यांच्या मोटारसायकलवरुन घरी सोडण्यास जात होते.
रस्त्यावरील एका खड्ड्यातून मोटारसायकल नेत असताना बिबट्याने डरकाळी फोडत अचानक या महिलेवर झडप घातली. तिला खाली पाडून फरफटत नेले.
आव्हाड यांनी तात्काळ बिबट्यावर दगडफेक केली. त्यामुळे बिबट्या 50 फूट अंतरावर जावून उभा राहिला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले.
लोकांचा जमाव पाहून बिबट्याने धूम ठोकली. या महिलेस बिबट्याने गंभीर जखमी केले आहे. दरम्यान या महिलेस तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.