अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. अन्न व पाण्याच्या शोधात या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे.
त्यामुळे या घटना सातत्याने घडत आहेत. यातच रस्त्यांमध्ये व्हॅनच्या वर्दीत प्राणी सापडले तर त्यांना जीवाला देखील मुकावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे.
तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव रस्त्यावर ब्राह्मणे वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी गेला. एक वर्ष वयाचा नर जातीचा सदर बिबट्या होता.
सदर घटनेची माहिती नगरचे उपवन संरक्षण अधिकारी साने तसेच कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. काळे यांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुराशे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. पशुसंवर्धन अधिकारी यांनी मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी केली.
हनुमंतगावच्या शिवारात बिबट्याची संख्या लक्षणीय असून रात्री वाड्या-वस्त्यांवर भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असतो.
रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडताना येणार्या वाहनांच्या प्रकाशात बिबट्यांस रस्ता दिसण्यास अडचणी तयार होतात.
तशात वाहन चालकही वाहनाचा वेग कमी न करता भीतीमुळे धडक देऊन निघून जातात. यामुळे बिबट्यासह अन्य प्राण्यांना प्राणाला मुकावे लागते आहे.