अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ म्युकर मायकोसिसची रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
यातच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघ असलेल्या तालुक्यात म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळून आला आहे.
पारनेर तालुक्यात म्युकरमायकोसिसने शिरकाव केला असून सुपा येथे पहिला रूग्ण आढळून आला असल्याची माहीती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.
सुपे येथील डॉ. बाळासाहेब पठारे यांच्या ओंकार हॉस्पिटलमध्ये या रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराचे निदान झाले असून त्यास पुण्याच्या ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. पठारे यांनी सांगितले.
तेथे या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस तालुक्यात येऊन पोहचल्याने नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे आशादायी चित्र असताना आता म्युकरमायकोसिस हातपाय पसरू लागल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
शिवाय कोरोनाच्या दुसर्या लाटेपाठोपाठ तिसरी लाट येण्याचीही चिन्हे असल्याने नागरीकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे ही बंधणे पाळणे गरजेचे आहे.