अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यादृष्टीने राज्यात दुसरा कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

केंद्राचा कायदा अडचणीचा :- थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षांची निवड, भाजपचं दबावतंत्र आणि एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या या विषयावर त्यांनी भाष्य केलं.

कृषी कायद्यासंदर्भात ठराव करण्याची काही जणांची मागणी आहे. त्या संदर्भातही चर्चा सुरू आहे. केंद्राचा कृषी कायदा हा शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य वेगळा कायदा करण्याच्या तयारीत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा अध्यक्षांची निवड होणार :- विधानसभा अध्यक्षांची निवड ही होईलच; मात्र सरकारमधील सर्वांना काळजी ही कोरोनाची आहे. कोरोना चाचणी केल्यानंतरच समजू शकेल, की किती आमदार या अधिवेशनात उपस्थित राहतात त्यावरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल निर्णय घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये :- पुण्यात स्वप्नील लोणकर या एमएपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली. त्या संदर्भात विचारलं असता, एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण विद्यार्थ्यांनी जरा संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

राज्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न :- भाजप केंद्राकडे पत्र पाठवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडून अशा पद्धतीनं दबाव आणून सरकारमधल्या लोकांना अडचणीत आणणं योग्य नाही. दबावतंत्राचा वापर करून भाजप लोकशाहीविरोधी काम करत आहे, असा आरोप थोरात यांनी भाजप नेत्यांवर केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24