अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-येत्या आठवड्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या.
या सगळ्यानंतर लॉकडाऊन जवळपास निश्चित असल्याचे मानण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको, तसेच लॉकडाऊनमुळे गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून मद्यप्रेमींनी अगोदरच ‘स्टॉक’ खरेदीवर भर दिला आहे.
नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरात शनिवारी रात्री ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. एकीकडे वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
तर दुसरीकडे कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या नालासोपारा शहरात लोकांनी दारुच्या दुकानाबाहेर तुंबड गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. राज्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय.
राज्यात आज दिवसभरात तब्बल 49 हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा हा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत बैठका घेतल्या.
यामध्ये चित्रपट, नाट्य क्षेत्रासह मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत चर्चा केली. या चर्चेत सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.