अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-श्रीगोंदातालुक्यातील काष्टी (गवतेमळा) येथे गेल्या आठ दिवसांपासून चार बिबट्यांनी तीन शेळ्या व तीन कुत्रे फस्त करीत धुमाकुळ घातला आहे.
बिबट्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत. या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. यावर वन खात्याकडून चार दिवसांपूर्वीच पिंजरा लावण्यात आला असला तरीसुद्धा बिबट्या पकडण्यात यश आलेले नाही.
काष्टी अजनुज रोडवर गवतेमळा येथे गेल्या आठ दिवसांपासून माणिकराव बापुराव गवते, सुनिल बाबासाहेब गवते यांच्या तीन शेळ्या तर शंकर बुवासाहेब गवते यांचे एक व इतर दोन कुत्रे बिबट्याने खाल्ले आहे.
बिबट्याची एक मादी व दोन पिल्ले परिसरात वावरताना येथील नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. दि.१२ रोजी सकाळी ७ वाजता परिसरातील नागरीकांना चार बिबट्याचे दर्शन झाले. यामध्ये दोन पिल्ले व दोन मोठे बिबटे आहे.
घटनेची माहिती वन अधिकारी राजेंद्र भोगे यांना दिली असता त्यांनी वनपाल घालमे, गुंजाळ, बुरहांडे, लक्ष्मण लगड, मुराद तांबोळी यांना पाठवत गवते यांच्या ऊसाच्या शेतात चार दिवसापासून पिंजरा लावला आहे. मात्र तरी बिबटे पकडण्यात यश आलेले नाही.
या भागात संपूर्ण ऊसाचे क्षेत्र आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने घोडचे आवर्तन सुटले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी अनेकांना शेतावर जावे लागते परंतु बिबट्याच्या भितीने लोक घराच्या बाहेर पडत नाहीयेत.