अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर गावाच्या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली.
बिबट्याचा वावर असल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतातील कामे करण्यासाठी कोणी पुढे जात नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर मधील चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात मेंढपाळ भिवा घुले हे आपल्या मेंढरांसह पाल ठोकुन राहत होते.
सोमवारी रात्री बिबट्याने त्यांच्या मेंढ्यावर हल्ला करत दोन मेंढ्या ठार केल्या. भिवा घुले यांनी आरडाओरडा करत बिबट्याला हुसकावून लावले. दोन बिबटे असल्याचे घुले यांनी सांगितले.
बिबट्यांना हुसकावून लावण्यात आल्या नंतर पुन्हा पहाटेच्या सुमारास दोन्ही बिबट्याने पालावर हल्ला करत एक मेंढी व कुत्र्याची शिकार केली. ही माहिती समजताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान जेऊर परिसरात यापूर्वी बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिलेले आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.