अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात चोरटयांनी हौदास माजवला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नुकतेच नगर शहरातील नागापूर उपनगरातील पितळे कॉलनीत मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरटयांनी एकाचवेळी दोन घरे, किराणा दुकान व मेडिकल फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोरक्ष दादाराम गारूडकर (रा. नागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील नागापूर उपनगरात चोरट्यांनी गारूडकर यांच्या घरातून पैसे, सोन्याचे दागिने चोरले.
त्यानंतर घराजवळ असलेले किराणा दुकान फोडून एकूण दोन 27 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला. याचवेळी पितळे कॉलनी येथे राहणारे नामदेव शंकर कांडके यांच्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप, सोन साखळी असा 35 हजारांचा मुद्देमाल चोरला.
त्यानंतर येथील सिनारे हॉस्पिटलमधील मेडिकल फोडून तेथून रोख तीन हजार रूपये चोरून नेले. एकाचवेळी चार ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.