अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटपूजनास आलेल्या महिलांना झाडांची अनोखी भेट देऊन व वृक्षांचे महत्व सांगून शारदाताई फाउंडेशनच्या वतीने
नेवासे तालुक्यात वृक्षरोपणास व संवर्धनास प्रोत्साहन देणारी वटसावित्री पौर्णिमा साजरी करत वृक्षसंगोपनाची शपथ घेण्यात आली.
‘एक व्यक्ती एक वृक्ष’ या वृक्ष लागवड मोहिमेला जनजागृतीद्वारे पाठबळ देऊ. तसेच कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर तीर्थक्षेत्र विकास कामांनाही गती देणार असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
वटपौर्णिमेनिमित्त नेवासे तालुक्यातील अकरा गावांत शारदाताई फाऊंडेशनच्या वतीने निसर्ग संवर्धनासाठी “एक झाड लावुया” उपक्रमांतर्गत सुमारे तीन हजार शंभर वृक्ष रोपांचे रोपण करण्यात आले.
त्याचा प्रारंभ वृक्षरोपांचे वाटप व वृक्षारोपण माजी सभापती सुनीता गडाख, नगर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते झाले.
त्या प्रसंगी गडाख बोलत होत्या. नेवासे तालुक्यातील नेवासे शहर, खरवंडी, सलाबतपुर, मक्तापुर, सोनई, माका, चांदे, कुकाणे, जळके बुद्रुक, प्रवरासंगम, भानसहिवरे या अकरागावांमध्ये ३ हजार १०० विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये वड, कडुनिंब, चिंच, करंज, गुलमोहर, शीसम, नारळ, जांभूळ, आंबा आदी वृक्षांचा समावेश होता. या उपक्रमातुन झालेल्या वृक्षरोपणाचा फायदा दीर्घकाळ होणार आहे.