अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-संगमनेर तालुक्यातील पारेगाव बु. येथील एका मांत्रिकाने एका विवाहितेला भूतबाधा झाल्याचे सांगत, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिक सावित्रा बाबुराव गडाख यास अटक केली आहे.
दरम्यान या मांत्रिकाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेला अनेक दिवसांपासून चक्कर येणे, अशक्तपणा हा त्रास जाणवत असल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या.
मात्र, गुण येत नसल्याने भावाच्या सांगण्यावरून त्या पतीसह सावित्रा गडाख या मांत्रिकाकडे गेल्या होत्या. भूतबाधा झाली असून ती काढावी लागेल, असे मांत्रिकाने त्यांना सांगितले.
भूतबाधा काढण्याच्या नावाखाली मांत्रिकाने पीडित महिलेला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.१०) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तातडीने मांत्रिकाला ताब्यात घेतले. या मांत्रिकाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.