अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे रविवारी सायंकाळी सहा वाजता डंपरच्या चाकाखाली चिरडून एक तरुण जागीच ठार झाला. परितोष रामचंद्र कुलकर्णी (वय ३२, रा. टाकळीमिया) असे मृताचे नाव आहे.
अपघाताची समजलेली माहिती अशी की, मयत परितोषच्या कुटुंबाचा जुना वाडा पाडला होता. त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यासाठी वाड्याच्या जागेची साफसफाई सुरू होती.
वाड्याची माती डंपर मधून वाहतूक करण्याचे काम चालू होते. गावातील एका चौकात अरुंद रस्त्यावर डंपरला वाट करून देण्यासाठी परितोष रस्त्यावर उभे होते. डंपर चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात घडला.
डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने परितोष जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. मृत परितोष नोकरीनिमित्त काही वर्ष अमेरिकेत वास्तव्यास होते. नंतर पुणे येथे राहत होते.
एक वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. नवीन इमारत बांधकामासाठी ते गावी आले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ, भावजयी, एक बहीण असा परिवार आहे. रामचंद्र भगवान कुलकर्णी यांचे ते चिरंजीव आहेत.