आली रे आली आता तुझी बारी … शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे.

गुन्हा घडला, त्यावेळी श्रीपाद छिंदम उपमहापौरपदावर असल्याने ही परवानगी आवश्यक होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

आता येत्या दोन दिवसात छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदम नगरचा उपमहापौर होता.

त्यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून वाद घालताना त्याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते.

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यानंतर भाजप कडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेऊन त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

या गुन्ह्यात त्याला अटक झाली. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी मोठा काळ गेला.

मधल्या काळात पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो विजयी झाला होता. मात्र, त्याचे हे पद नंतर रद्द करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24