अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटर मध्ये कोविड रुग्णांची आर्थिक लूट करून नगरपालिकेच्या संगनमताने तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याने चौकशी करून कारवाई करावी असी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनात ढुस यांनी पुढे म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होत असले बद्द्ल शंका आल्याने सदर कोविड सेंटरची आम्ही दि. १३/०५/२१ रोजी नगरपरिषदेकडे माहिती मागितली होती.
तथापी दहा दिवस उलटूनही आम्हाला माहिती मिळाली नसल्याने आम्ही दि. २३/०५/२१ रोजी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. तदनंतर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी दि. २५/०५/२१ रोजी आम्ही मागितलेली अर्धवट माहिती उपलब्ध करून दिली आहे.
त्या उपलब्ध माहिती मध्ये अनेक त्रुटी आढळून येत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषद व खाजगी कोविड सेंटर यांनी संगनमताने तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे प्रथमदर्शनी कागदपत्रांवरून खालील मुद्दे पाहता आढळून येत आहे. (१) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये खाजगी कोविड सेंटर चालविणेस देणेसाठी नगरपरिषदेने कोणतीही जाहिरात देऊन निविदा मागविल्या नाहीत.
(२) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये खाजगी कोविड सेंटर चालविणाऱ्या व्यक्तीसोबत नगरपरिषदेने कोणताही करारनामा केलेला नाही. (३) देवळाली प्रवरा नगरपरिषदेने ठराव संमत करून या खाजगी कोविड सेंटरला वाणिज्य केंद्राची इमारत, वीज व पाणी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.
(४) देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटर मध्ये आत्तापर्यंत भरती झालेल्या रुग्णांची गाव व ऍडमिट निहाय यादी नगरपरिषदेकडे उपलब्ध नाही. (५) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये खाजगी कोविड सेंटर चालविणेसाठी आलेल्या मागणी अर्जावर त्या अर्जदार डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेची कोणतीही नोंद नाही.
तथापि नगरपरिषदेने त्या अर्जदाराला परवानगी देताना परवानगी पत्रावर त्याच अर्जदाराची शैक्षणिक पात्रता एम. डी. अशी दाखविली आहे. परंतु त्याच अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र मात्र बी. ए. एम. एस. असे आहे. (६) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये खाजगी कोविड सेंटर सुरू करणेसाठी एका डॉक्टरचा दि. ०१/०४/२१ रोजीचा मागणी अर्ज आहे.
व त्यांनाच हे कोविड सेंटर चालविणेस नगरपरिषदेने परवानगी दिली आहे. परंतु जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांचेकडे देवळाली प्रवरा डेडिकेटेड कोविड सेंटर एका बीएमए डॉक्टरच्या नावाने नोंदणी केली आहे. व त्यांनाच दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत हे कोविड सेंटर चालविणेस जिल्हा रुग्णालयाने प्रमाणपत्र बहाल केले आहे.
(७) कोणत्याही एम बी बी एस किंवा एम डी डॉक्टरचे तसेच चेस्ट फिजिशियनचे लेखी प्रमाणपत्र व हमी असल्याशिवाय नगरपरिषद इमारतीमध्ये हे खाजगी कोविड सेंटर चालवून देवळाली प्रवरा नगरपरिषदेने नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. (८) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे इमारतीमध्ये खाजगी कोविड सेंटर सुरू करणेस नगरपरिषदेने परवानगी दिलेले डॉक्टरचे प्रामाणपत्र बी ए एम एस दिसत आहे.
त्यामुळे रेमडेसीविर सारखी अलोप्याथीची सर्वात पॉवरफुल औषधे बी ए एम एस डॉक्टर देऊ शकत नाही. (९) देवळाली प्रवरा नगरपरिषदेने विनामूल्य इमारत, वीज व पाणी उपलब्ध करून दिले असताना देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटरने कोविड रुग्णांना कॉट भाडे पोटी प्रतिदिन साडेतीन ते दहा हजार रुपयांपर्यंत बिल आकारले आहे.
त्यामुळे येथील कोविड रुग्णांची करोडो रुपयांची आर्थिक लूट झाली असून देवळाली प्रवरा नागरपरिषदेला व देवळाली प्रवरा शहराला त्याचा काहीही फायदा झाला नाही. (१०) देवळाली प्रवरा नगरपरिषदेने विनामूल्य इमारत, जागा, वीज व पाणी उपलब्ध करून दिलेल्या या देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटर मध्ये प्रतिदिन प्रति रुग्ण जवळपास दहा हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
त्यामुळे पन्नास बेडचे क्षमता असलेल्या या खाजगी कोविड सेंटरमध्ये प्रतिदिन पाच लाख रुपये उत्पन्न संबंधित कोविड सेंटर चालकाने कमावले आहे. या हिशोबाने दि. ०१/०४/२०२१ ते दि. ३१/०५/२०२१ या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये या कोविड सेंटर चालकाने तीन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करून कमाई केली आहे.
सबब देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटर व देवळाली प्रवरा नगरपरिषदेने संगनमत करून देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांची फसवणूक करून विस्वासघात केला आहे. तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान व कोविड रुग्णांची आर्थिक लूट करून कोट्यावधी रुपयांचा धंदा या खाजगी कोविड सेंटर चालकाने केला असल्याचे वरील सर्व मुद्यामधून स्पस्ट होत आहे.
तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेने या खाजगी कोविड सेंटर चालकाला नगरपरिषद अधिनियमांचा भंग करून विनामुल्य इमारत, जागा, वीज व पाणी दिलेने नागरपालिकाही या गोरख धंद्यामध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे देवळाली प्रवरा डेडिकेटेड खाजगी कोविड सेंटरच्या आडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून सदर उलाढालिची चौकशी होऊन ही रक्कम संबंधितांकडून वसूल करणेत यावी व देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे रीतसर भरणा करावी आणि चौकशी अंती दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनाचे शेवटी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे.