अबब..किराणा दुकान फोडून चोरट्यांनी लांबविला ९ लाखाचा मुद्देमाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  कोविडच्या संकटात आधीच व्यवसायांवर गदा आलेली असताना कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरवासियांतून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील येवला रस्ता येथील संतोष एजन्सीचे गोडावून मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते बुधवारी (ता.२८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास फोडून ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील येवला रस्ता येथील मयूर संतोष कासलीवाल यांच्या संतोष एजन्सी गोडवूनमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा माल भरलेला होता. मंगळवारी सायंकाळी ते बुधवारी सकाळी अज्ञात चोरट्याने गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडून ५ लाख ६५ हजार ७०० रुपयांचे संतूर, लक्स, गोदरेज नं-१, डेटॉल साबणाचे बॉक्स,

८६ हजाराचे सपट चहा पावडरचे बॉक्स, १० हजार ९०० रुपयांचे कोकोनट तेलाचे बॉक्स, १ लाख ९ हजार ३०० रुपयांचे मसाला बॉक्स असा ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत मयूर कासलीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुरनं-२३७/३०२१ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तत्पूर्वी कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू होऊनही पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आधीच दीड वर्षांपासून कोविड महामारीचे संकट सुरू असल्याने व्यवसाय करण्यास अनेकदा निर्बंध घातलेले आहे. त्यातच चोऱ्या सुरू झाल्याने व्यापारी पुरते हतबल झाले आहेत.

त्यामुळे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडक कारवाईचे प्रदर्शन घडवले होते. आता त्याच कारवाईची अपेक्षा शहरवासियांनी व्यक्त करत रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

अन्यथा पोलिसांच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनक्षोभ उसाळेल अशी भीती अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24