शिवभोजन थाळीचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती.

याच योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात सध्या ३५ केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू असून त्यात दररोज ६ हजार १५० थाळ्यांचे वाटप होते. परंतु या केंद्रचालकांचे गेल्या तीन महिन्यांचे सुमारे दोन कोटी रुपये अनुदान थकले आहे.

शिवभोजन ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून यात प्रारंभी १० रुपयांना गरजू तसेच ज्यांची जेवणाची सोय नाही अशांना शिवथाळी देण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी पूर्णत: मोफत करण्यात आली.

नगर जिल्ह्यात सध्या ३५ शिवथाळी केंद्र सुरू असून त्यापैकी १४ केंद्र नगर शहरात आहेत. प्रत्येक केंद्राला दीडशे, दोनशे थाळीवाटपाचे उद्दिष्ट असून दररोज एकूण ६ हजार १५० थाळ्या वाटप होतात.

या थाळ्यापोटी शहरातील केंद्रचालकाला प्रत्येक थाळीमागे ५०, तर ग्रामीण भागातील थाळीला ३५ रुपये अनुदान मिळते. दर १५ दिवसांनी हे अनुदान केंद्रचालकांना वाटप करण्याच्या शासनाच्या सूचना असून

जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागातर्फे या योजनेचे नियोजन केले जाते. दर महिन्याला साधारण ७० ते ७५ लाख रुपये योजनेच्या अनुदानापोटी केंद्रचालकांना दिले जातात.

परंतु १५ मार्चपासून म्हणजे तीन महिन्यांपासून हे अनुदानच वाटप झालेले नाही. या कालावधीचे सुमारे २ कोटी रुपये अनुदान रखडल्याने शिवथाळी केंद्रचालक अडचणीत आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24