अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- जुन्या ज्येष्ठ मंडळींनी जिल्ह्यात विकासाची मंदिरे उभी केली आहेत. जिल्ह्याचा कायाकल्प करण्यात ज्येष्ठ मंडळीचा मोठा वाटा आहे.(MLA Vikhe)
ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, काम करताना टीका होत असते. विरोधकांची टीका मनोरंजन म्हणून घ्या,असा सल्ला आमदार राधाकृष्ण विखे यांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना दिला.
देवळाली प्रवरा शहरात ८० कोटी रुपये खर्चाच्या भूमिगत गटार व मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा भूमिपूजन समारंभ आमदार विखे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे होते. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, कारखान्याचे माजी संचालक उत्तम म्हसे, सुरसिंग पवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, शिवाजी मुसमाडे, भाजपाचे शहराध्यक्ष अजित चव्हाण,
नानासाहेब गागरे,वसंत कदम सिद्धार्थ कदम आदी उपस्थित होते आमदार विखे म्हणाले, देवळाली पालिकेने काळाची पावले ओळखून हा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. स्वच्छ व सुंदर शहराचा लौकिक देवळाली प्रवरा पालिकेने कायम ठेवला आहे.
गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत शहरीकरण ७२ टक्क्याने वाढले आहे. शाळा, पाणी, वीज व आरोग्य सुविधा मिळत असल्याने ग्रामीण भागातील मुले ग्रामस्थ यांचा शहराकडील ओढा वाढलेला आहे.
नगराध्यक्ष कदम यांच्याकडे बघत जनताजनार्दनाच्या मनात तुम्ही आहात त्यामुळे चिंता करू नका विरोधकांची टीका नेहमी मनोरंजन म्हणून घ्यायची असते,असा सल्ला त्यांनी दिला. प्रास्ताविक मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.
नगराध्यक्ष कदम यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. राहुरी फॅक्टरीवर स्विमिंग टॅंक सह दहा कोटीचे कामे केल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली प्रवरा, फॅक्टरी असा दुजाभाव नगराध्यक्ष पदावर असल्यावर करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच वर्षाच्या कालावधीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री, अजित पवार, मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह आमदार विखे यांचे पालिकेला सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी विखे कुटुंबीय आणि कदम कुटुंबीय यांचे फार जुने संबंध असल्याचे सांगत आमदार विखे हे प्रवरेचे महंत आहेत असे संबोधन लावले. स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी, तर आभार सभापती सचिन न्यूस यांनी मानले.