अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना जालना येथून पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
या प्रकरणातील इतर पाच आरोपींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. माळवाडगाव येथील व्यापारी रमेश रामलाल मुथ्था व त्याचा मुलगा चंदन रमेश मुथ्था हे दोघे काही दिवसांपासून पसार होते.
दोघेही जालना येथे एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस गुरुवारपासून जालना येथे तळ ठोकून होते. या गुन्ह्यात पोलिसांनी गणेश रामलाल मुथ्था,
आशा गणेश मुथ्था दोघांना गणपूर (ता. चौपडा. जि. जळगाव) येथून तर चांदणी चंदन मुथ्था हिला बलसाना (ता. साक्री. जि. धुळे) येथून यापूर्वी अटक केली आहे. त्यांना शनिवार (ता. १०) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे.
पोलीसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर रमेश व चंदन मुथ्था या दोघांना अटक करण्यात आली. रमेश मुथ्था याने माळवाडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, मका खरेदी केला होता.
त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करुन शेतमालाचे पैसे देण्यापुर्वीच रातोरात गाव सोडले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात व्यापारी मुथ्थाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांकडुन पसार मुथ्था कुटूंबाचा शोध सुरु असताना अखेर सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पोलीस पथकाला यश आले.
मुख्य आरोपींना गडाआड केले. असून आता त्यांना मदत करणाऱ्या नातेवाईकांना गुन्ह्यात सहआरोपी केले जाणार आहे.