अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरूद्ध आणखी एक दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयात दाखल झाले आहे.

बाळ बोठेला अटक केल्यापासून पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे न्यायालयीन कोठडीत असताना कोठडीत मोबाइल आढळून आला होता.

पारनेरच्या कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचा गुन्हा त्याच्यासह पंधरा जणांविरुद्ध दाखल असून त्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याक बळप यांनी दिली.

दरम्यान, बोठे विरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल असून त्याचा तपास अद्याप सुरूच आहे. बोठे याने वकिलाशी संपर्क करण्यासाठी त्या मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले.

त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याचा तपास पूर्ण करून या सर्व आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.