ताज्या बातम्या

बायोडिझेल’च्या रॅकेटमधील आरोपींना कायमस्वरूपी जिल्हा बंदी करावी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  शहरात अवैध बायोडिझेल विक्रीच्या रॅकेटमधील आरोपींनी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडवला आहे.

त्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. केडगाव बायपास चौकात काही दिवसांपूर्वी पुरवठा विभाग व पोलिसांनी अवैध बायोडिझेलच्या रॅकेटवर कारवाई केली. राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश असल्याचे समोर आले.

राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबले जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी शिवसेना पक्षातील शहरप्रमुख दिलीप सातपुते यामधील प्रमुख आरोपी असल्याने सारवासारव होत आहे, असा आरोप निवेदनात केला आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्यांना अटक झालेली नाही.

अवैध बायोडिझेलचा व्यापार हा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून सुरु आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली आहे. या प्रकरणात चौकशी केल्यास अजून किती राजकीय पुढारींचा यामध्ये समावेश आहे, ते समोर येईल, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी जिल्हा बंदी करावी, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office